Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात टी20 52 चेंडूत 78 धावांची खेळी केली. यासोबतच रिझवानने 2021 वर्षात टी20 मध्ये 1200 धावा पूर्ण केल्या आहेत.त्याने 27 सामन्यातील 24 डावांत ही कामगिरी केली आहे. रिजवानने यंदाच्या वर्षभरात टी20 सामन्यात 11 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं आहे. 


यावर्षी रिझवानचा बेस्ट स्कोर 104 धावा इतका होता. याशिवाय रिझवानने वर्षभरात 105 चौकार लगावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. रिझवानने आतापर्यंत 12 अर्धशतकं लगावली आहेत. 52 सामन्यात त्याने 49.51 च्या सरासरीने 1 हजार 436 धावा केल्या आहेत. तर सर्व टी20 सामन्यांचा विचार करता 135 डावांत 39 च्या सरासरीने त्याने 3 हजार 862 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.



असा पार पडला सामना


प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने मोहम्मद रिझवान 78 आणि हैदर अलीच्या 68 धावांच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या बळावर 200 धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद रिझवान याने 52 चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. तर हैदर अलीने चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 39 चेंडत 68 धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय अखेरच्या षटकात मोहम्मद नवाज याने 10 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. फखार जमान आणि असिफ अली यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वेस्ट विंडिजकडून रोमिरिओ शेफर्ड याने सर्वाधिक दोन बळी घेतले. अकेल हुसेन, ओशेन थॉमस आणि स्मिथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


पाकिस्तानने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट विंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर सलामीवीर फलंदाज ब्रँडोन किंग बाद झाला. शाय होप आणि निकोलस पुरन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. शाय होपने 31 धावांची तर पुरन याने 18 धावांची खेळी केली. याशिवाय कायरॉन पॉवेल याने 23 धावांची खेळी केली. शाय होपचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडचा आला नाही. शाय होप यानेही संथ फलंदाजी केली. होपने 31 धावांसाठी 27 चेंडू खर्च केले. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम याने सर्वाधिक चार बळी घेतले. तर शादाब खान याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाज आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha