Impact Player Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) इम्पॅक्ट प्लेयर नियम कोणत्याही प्रकारे लागू होणार नाही, अशी नोटीस बीसीसीआयकडून सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना पाठवण्यात आली आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये इम्पॅक्ट नियम कायम असणार आहे. आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम वापरावर कोणतीही बंदी आणण्यात आलेली नाही. 


बीसीसीआयने (BCCI) राज्यातील क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, बीसीसीआयने चालू देशांतर्गत हंगामातील इम्पॅक्ट प्लेअर नियम (Impact Player Rule) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान इम्पॅक्ट प्लेअर या नियमाचा वापर सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेत करण्यात आला होता. यानंतर आयपीएलमध्येही या नियमाचा वापर करण्यात आला. मात्र आता सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेतच इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. 


खेळाडूंनी उपस्थित केले होते प्रश्न-


आयपीएलच्या शेवटच्या हंगामात, रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील इम्पॅक्ट प्लेअर नियमावरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच मोहम्मद सिराज म्हणाला होता की, हा नियम लागू केल्याने आयपीएलमध्ये गोलंदाजांसाठी काहीच फायद्याचे उरले नाही. इम्पॅक्ट प्लेअर नियम अष्टपैलू खेळाडूंची कारकीर्द बरबाद करण्याचे कारण ठरल्यामुळे टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र यानंतरही आयपीएल संघ मालकांचे असं मत होते की हा नियम लागू झाल्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनली आहे.


'इम्पॅक्ट प्लेअर' नियम काय आहे?


इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, नाणेफेकीनंतर, प्रत्येक संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी, त्यापैकी एक – ज्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणतात. प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही सदस्याची जागा घेऊ शकतो.


रोहित शर्मा काय म्हणाला होता?


याबाबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नाही, कारण त्यांना कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मात्र, या नियमामुळे दोन भारतीय खेळाडूंना अतिरिक्त खेळण्याची संधी मिळते, ही सकारात्मक बाब आहे."


संबंधित बातमी:


Ind vs Pak : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भिडणार भारत-पाकिस्तान; कधी, कुठे, किती वाजता रंगणार सामाना, जाणून घ्या A टू Z माहिती