Asia Cup Points Table & Equation : रविवारी कोलंबोत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवावा लागला. सुपर 4 मधील महत्वाच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे चाहत्यांच्या रंगाचा बेरंग झाला. पण आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. सध्या कोलंबोतील हवामान स्वच्छ आहे. पण आजही संध्याकाळी कोलंबोत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार? याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.


भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला तर...


सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल. असे असताना भारतीय संघ फायनलमध्ये कसा पोहचणार? याबाबत जाणून घेऊयात.. 


आजही सामना झालाच नाही तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार..? पाहा संपूर्ण समीकरण 


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारीही कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  जर आज सामना रद्द झाला तर भारताच्या आशिया चषक फायनलमध्ये पोहचण्यासाठी अडचणीत वाढ होऊ शकते. पाकिस्तानविरोधात भारताने दमदार सुरुवात केली आहे. आजचा सामना भारत जिंकण्याची शक्यता आहे. पण पावसाने खोळंबा केल्यास भारताला फक्त एक गुणांवर समाधान मानावे लागेल. भारतीय संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश संघाविरोधात भिडायचे आहे. या दोन्ही संघाचा पराभव केल्यास भारतीय संघ फायनलमध्ये पोहचू शकतो. अन्यथा आशिया चषक फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला इतर संघाच्या कामगिरीवर राहवे लागले. 
 
एका सामन्यात पराभव झाल्यास... 
 
पाकिस्तान वगळता भारतीय संघाला श्रीलंका आणि बांगलादेश संघाविरोधात भिडायचे आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवावाच लागणार आहे. पण जर दोन्हीपैकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर इतर संघाच्या कामगिरीवर भारताला अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्याशिवाय श्रीलंका संघानेही बांगलादेशला नमलेय. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाकडे प्रत्येकी दोन दोन गुण झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यावर भारताला अवलंबून राहावे लागेल. कारण, या दोन्हीमधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार... हे आता जवळपास निश्चित झालेय.