World Cup 2023 Yuvraj Singh : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. आयसीसीकडून वेळापत्रकही जारी करण्यात आलेय. दहा संघाने तयारी सुरु केली आहे. भारतीय संघानेही आपली तयारी सुरु केली आहे. जगभरातील क्रीडा चाहते रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विश्वचषक विजायाचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगत आहेत. पण भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दोन वेळाचा विश्वचषक विजेता युवराज सिंह याला भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असे वाटत नाही. Cricket Basu या युट्युब चॅनलशी बोलताना युवराज सिंह याने भारतीय टीमबाबत मोठं वक्तव्य केलेय.
2007 टी20 आणि 2011 च्या विश्वचषक विजयात युवराज सिंह याने मोठी भूमिका बजावली होती. युवराज सिंह याला दोन्ही स्पर्धेत मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याच युवराजला भारत घरच्या मैदानावर विश्वचषक 2023 जिंकू शकेल की नाही, याची त्याला खात्री नाहीये.. त्यामागील कारणेही युवराज सिंह याने सांगितली आहेत. तो Cricket Basu या युट्युब चॅनलसोबत बोलत होता. त्याला भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना युवराज सिंह म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर भारतीय संघ विश्वचषक जिंकेल, याची मला खात्री नाहीये. भारताच्या मधल्या फळीत दुखापतींविषयी चिंता आहे. पण मी एक देशभक्तासारखे भारत जिंकेल, असे म्हणू शकतो.
चौथ्या क्रमांकाचा पुन्हा प्रश्न -
युवराज सिंह याने भारतीय संघाच्या कमकुवत बाजूबाबत स्पष्ट शब्दात आपले मत मांडले. तो म्हणाला की, भारतीय संघाचे आघाडी फलंदाज चांगले आहेत. पण चार आणि पाच क्रमांक महत्वाचा आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचे गणित बिघडले आहे. आयपीएलमध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो, तर भारतीय संघातही त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला हवे. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाला दबावात धावा काढता आल्या पाहिजेत.. ऋषभ पंत वेगाने धावा काढण्यात तरबेज आहे, असे युवराज म्हणाला.
रिंकूबद्दल काय म्हणाला युवराज ?
चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाजाला पाहतो, या प्रश्नावर बोलताना युवराज सिंह याने केएल राहुल याचे नाव सजेस्ट केले. त्यानंतर युवराज सिंह याने रिंकू सिंह याच्या नावाचाही उल्लेख केला. युवराज म्हणाला की, रिंकू सिंह चांगला फलंदाज आहे. तो वेगाने धावा काढण्यासोबत आपली विकेट जाऊ देत नाही. तो चांगली भागिदारी करु शकतो.
रोहितबद्दलही वक्तव्य -
भारताला विश्वचषक न जिंकताना पाहणे निराशाजनक आहे. पण असेच आहे. मागील दहा वर्षांत भारतीय संघात अनेक चढउतार आले आहेत. सध्या आपल्याकडे एक समंजस्य कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने आपल्या प्लॅनिंगवर लक्ष दिले पाहिजे. संघ बांधणीसाठी काही सामन्याची गरज आहे. 15 जणांच्या टीमची निवड करण्यासाठी आपल्याकडे चांगले 20 खेळाडू निवडावे लागतील.