मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करणं क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांच्या अंगाशी आलं आहे. विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर मांजरेकर यांनी काही खेळाडूंवर निशाणा साधला होता. यानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने संजय मांजरेकर यांना चांगलंच सुनावलं. जाडेजाने ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला.

काय आहे प्रकरण?
30 जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभ झाला होता. भारताचा हा विश्वचषकातील पहिला पराभव ठरला. या पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाच्या समावेशाचे संकेत दिले होते.

परंतु जाडेजाच्या संघात सामील होण्याच्या वृत्तावर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "तुकड्यांमध्ये परफॉर्म करणाऱ्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहू शकत नाही. तुकड्या-तुकड्यांमध्ये परफॉर्म करणारे खेळाडू मला आवडत नाही, जसा की सध्या रवींद्र जाडेजाचा वनडेतील परफॉर्मन्स. मला एकतर गोलंदाज आवडेल किंवा फलंदाज."

रवींद्र जाडेजाचं उत्तर
संजय मांजरेकर यांच्या कमेंटवर रवींद्र जाडेजा भडकला. त्याने ट्वीट करुन मांजरेकर यांना खडेबोल सुनावले. संजय मांजरेकर यांना मेंशन करुन जाडेजाने लिहिलं की. "मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काही कमावलं आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका. मी तुमच्या 'व्हर्बल डायरिया' बाबत खूप ऐकलं आहे."


दरम्यान, रवींद्र जाडेजाने यंदाच्या विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. पण बदली खेळाडू म्हणून त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. त्याने 151 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करुन 2035 धावा केल्या असून 174 विकेट्स घेतल्या आहे. तर मांजरेकर यांनी 74 वनडे सामन्यात 1994 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे.

धोनीवर टीका मांजरेकरांना महागात
दुसरीकडे स्ट्राईक रेट आणि स्ट्राईक रोटेट न केल्याने महेंद्र सिंह धोनीवर टीका केल्याप्रकरणी संजय मांजरेकर यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. 2019 च्या विश्वचषकात आतापर्यंत धोनीचा स्ट्राईक रेट धीमा आहे. धोनीच्या खेळीबाबतही संजय मांजरेकर यांनी ट्वीट केलं होतं. फिरकीविरोधात धोनीच्या स्ट्राईक रेटवरुनही संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते.