मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. पण तरीही धवन डगमगलेला नाही. लवकरच पुन्हा एकदा 22 यार्ड्सच्या पिचवर पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.


अंगठ्याला दुखापत होऊनही 117 धावांची खेळी रचणाऱ्या धवनची हिंमत अजूनही शिखरावर आहे. आपल्या ट्विटर हॅण्डलवर शायर डॉ. राहत इंदोरी यांच्या कवितेच्या ओळी शेअर करुन त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिखर धवनने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,

कभी महक की तरह हम घुलो से उड़ते हैं...
कभी धुंए की तरह हम परबतों से उड़ते हैं...
ये कैंचियां हमें उड़ने से खाक रोकेगी...
के हम पैरों से नहीं हौंसलों से उड़ते हैं...

धवनने या ट्वीटमधून जाहीर केलं आहे, तो आपल्या हिंमतीच्या जोरावर दुखापतीतून सावरुन लवकरच संघात सामील होईल आणि मैदानावर खेळताना दिसेल.


शिखर धवनच्या या ट्वीटला डॉ. राहत इंदोरी यांनीही रिप्लाय दिला आहे. ते लिहितात,

बहुत गुरुर है दरिया को अपने होने पर,
जो मेरी प्यास से उलझे तो धज्जियाँ उड़ जाएँ.... ज़िंदाबाद


शिखर धवनला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

रिषभ पंत इंग्लंडला रवाना
विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल. मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे.