सिडनी : हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आणि एलिस पेरीची ऑस्ट्रेलियन फौज. या दोन तुल्यबळ संघांच्या लढतीने आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं बिगुल वाजणार आहे. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये विश्वचषकाचा सलमीचा सामना खेळवण्यात येणार आहे. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या भारतीय संघाने यंदा चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही आपलं विजेतपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात भारताचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. या गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विश्वचषकाच्या या आव्हानाला सामोरं जाताना भारतीय संघाची मदार असेल ती प्रामुख्याने स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर. स्मृती आणि हरमनला ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. बिग बॅशमध्ये या दोघीही अनुक्रमे ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे स्मृती आणि हरमनकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. शेफाली वर्मा आणि मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स या ताज्या दमाच्या फलंदाजांचं योगदानही मोलाचं ठरेल. तर दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूनम आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल. 2017 च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणि 2018 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण यावेळी नव्या आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरं जाण्याचा मानस विश्वचषकासाठी निघण्यापूर्वी स्मृती मानधनाने एबीपी माझाकडे व्यक्त केला होता. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांना आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरचा सध्याचा ते स्वप्न यंदा साकारणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.ICC Womens T20 World Cup 2020 | सलामीच्या सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई | 21 Feb 2020 08:10 AM (IST)