ICC U-19 World Cup :  भारताच्या युवा संघानं अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं गतविजेत्या बांगलादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. बांगलादेशनं दिलेलं अवघं 112 धावांचं आव्हान भारतानं 31व्या षटकातच पार केलं. मुंबईकर अंगरिक्ष रघुवंशीनं 44 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याआधी भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 111 धावात संपुष्टात आला. रवी कुमारनं 3 आणि विकी ओस्तवालनं 2 फलंदाजाना माघारी धाडलं. तर राजवर्धन हंगर्गेकर, कौशल तांबे आणि रघुवंशीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या बुधवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 


उपांत्यपूर्वी सामन्यात भारताचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. बलाढ्य पाकिस्तानचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं मोडून काढलं होतं. अशा स्थितीत उपांत्य फेरीचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. 


रघुवंशीने उपयुक्त खेळी खेळली


112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि शून्य धावांवर हरनूर सिंहची विकेट गमावली. यानंतर अंगरिक्ष रघुवंशी आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी 70 धावांची भागीदारी करत भारताचा मार्ग सुकर केला. रघुवंशीनं 65 चेंडूंवर सात चौकारांच्या मदतीनं 44 धावा आणि शेख रशीद यांनी 26 धावांची खेळी केली. 


मात्र, ही भागीदारी मोडून काढत बांगलादेशने विकेट घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. अखेर भारताने 30.5 षटकांत 5 बाद 117 धावा करून सामना जिंकला. कौशल तांबेने शानदार षटकार ठोकत भारताला विजयाच्या दारात नेलं. बांगलादेशकडून रिपोन मोंडलने चार बळी घेतले. 


2022 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास


भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha