ICC T-20 World Cup 2021 : आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळविण्यात येणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे प्रस्तावित केले होते. परंतु, कोरोना साथीच्या आजारामुळे आयसीसीने त्यांचे ठिकाण बदलले आहे. जरी ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली जाणार असली तरी याचे यजमानपद भारताला मिळू शकते.


आयपीएलनंतर स्पर्धा सुरू होणार
अलीकडेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात सध्या सुरू असलेल्या आयपीएलला मध्येच थांबवावी लागली. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरपासून युएईमध्येही खेळवले जाणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या काही दिवसानंतर ही आयसीसी स्पर्धा युएईमध्ये सुरू होईल. त्यामुळे येते काही महिने क्रिकेटप्रेमींसाठी खूप मनोरंजक ठरणार आहेत.


बीसीसीआय आयसीसीला माहिती देणार
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर बीसीसीआय लवकरच आयसीसीला टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये हलविण्याविषयी अधिकृतपणे माहिती देईल. युएईमध्ये विश्वचषक आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन केले गेले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.


टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाची नजर टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यावर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसीचं मोठं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवेल.