नवी दिल्ली : जर इंग्लिश खेळाडूंची कुटुंबं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकत नसतील तर यंदाची अ‍ॅशेस मालिका रद्द केली पाहिजे, असं वक्तव्य इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केलं आहे. इंग्लिश क्रिकेटपटू अ‍ॅशेस मालिकेसाठी यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियामधील कोरोना प्रोटोकॉलमुळे खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊ शकत नाहीत.


वॉनने ट्विट म्हटलंय..
वॉन यांनी ट्वीट केले की, "इंग्लंडचे क्रिकेटपटू आपल्या कुटुंबातील सदस्यांना अ‍ॅशेसमध्ये घेऊन जाता येणार नाही, असा रिपोर्ट वाचण्यात आला. जर ते शक्य नसतील तर अ‍ॅशेस रद्द केली जावी. कारण चार महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहणे मान्य नाही."






पीटरसनने केलं होतं विधान
वॉनशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसननेही असे म्हटले आहे की, कुटुबाला घेऊन जाता येत नसल्याने अ‍ॅशेसमध्ये कोणता खेळाडू जाण्यास नकार देत असेल तर त्या खेळाडूला पाठिंबा देईन. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यानेही अ‍ॅशेस जिंकणे एक आव्हान असून कुटुंबाशिवाय ते अधिक कठीण जाईल असे मत व्यक्त केले.


तो म्हणाला होता, की "संघातील बर्‍याच खेळाडूंना लहान मुलं आहेत, ज्यांना सोडणे त्यांना कठीण जाईल. मला आशा आहे की यावर सकारात्मक तोडगा निघू शकेल." या अहवालानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियन सरकारला इंग्रजी क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.