ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. तिसर्‍या कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्माला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. यासह तीन सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेणाऱ्या भारताच्या स्टार स्पिनर आर अश्विनचा समावेश पहिल्या तीन गोलंदाजांमध्ये झाला आहे.


या मालिकेत रोहित शर्मा हा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तिसर्‍या कसोटीनंतर रोहित शर्माने रँकिंगमध्ये 6 स्थानांची कमाई केली आहे. कसोटी क्रमवारीत रोहित शर्माचा प्रथमच पहिल्या दहा फलंदाजांमध्ये समावेश झाला आहे आणि तो आता आठव्या स्थानावर आहे.





तिसर्‍या कसोटीनंतर आर अश्विननेही क्रमवारीत चार स्थान वर जागा मिळवली आहेत. आर अश्विन आता सातव्या क्रमांकावरून तिसर्‍या स्थानावर आला आहे. जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर घसरण झाली.


जसप्रीत बुमराहची घसरण


केन विल्यमसन फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिन्स 908 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या दहामध्ये आहे मात्र, तिसर्‍या कसोटीनंतर बुमराहला एक स्थान गमवावं लागलं आहे. आता तो 9 व्या स्थानावर घसरला आहे.