लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज तुल्यबळ न्यूझीलंडशी आहे. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक मोहिमेची मोठ्या झोकात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला नमवून, तीनपैकी तीन सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संघांत चुरशीचा सामना अपेक्षित आहे. पण विश्वचषकातल्या याही सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे सामन्याची वेळ पुढे ढकलली आहे. 3 वाजता सामना व्यवस्थापक सामन्याची वेळ जाहीर करतील.


दरम्यान, भारताचा सलामीवीर शिखर धवन जखमी असल्यामुळे त्याच्या जागी आज कोणाला संघात स्थान मिळणार याची सर्वांना उस्तुकता आहे. शिखर धवनच्या जागी के.एल. राहुल सलामीला फलंदाजी करणार आहे. परंतु संघात अकरावा खेळाडू म्हणून कोणाचा समावेश होणार याबद्दलही लोकांमध्ये कुतूहल आहे.

रोहित शर्मा आणि के.एल. राहुल सलामीला येतील. तर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. दिनेश कार्तिकला चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे कार्तिकला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू विजय शंकरदेखील चौथ्या क्रमांकावर खेळण्यास समर्थ आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावरील फलंदाजासाठी विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल.

मधल्या फळीत भारतीय संघ बलवान आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या, माजी कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू केदार जाधव मधल्या फळीत फलंदाजी करतील. गोलंदाजीमध्ये भारतीय संघाला कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही. जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल हा गोलंदाजांचा तोफखाना भारताकडे आहे.