IND vs ENG, World Cup 2023 :  गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. पण बेस्ट प्लेईंग11 खेळवण्याचे आव्हान रोहित शर्मापुढे असेल. लखनौची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असेल, असा अंदाज आहे. अशामध्ये कुणाला बेंचवर बसावे लागणार, याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 


सूर्यकुमार यादव की ईशान किशन


हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत एक फलंदाज आणि गोलंदाज खेळवावा लागतो. न्यूझीलंविरोधात सूर्याला संधी देण्यात आली होती, पण त्याला छाप पाडता आली नाही. तो फक्त दोन धावांवर बाद झाला होता. आता ईशान किशन याला संधी देणार की पुन्हा सूर्यालाच मैदानात उतरवणार... याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. ईशान किशन डावखुरा असल्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकते, असा काहींचा तर्क आहे. आता रविवारीच यावरुन पडदा उठेल.  


तीन वेगवान गोलंदाज की तीन फिरकी गोलंदाज - 


लखनौची खेळपट्टी फिरकी माऱ्याला मदत करते, पण लखनौच्या मैदानात वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळाल्याचे आतापर्यंतच्या सामन्यावरुन दिसलेय. त्यामुळे रोहित शर्मा तीन वेगवान गोलंदाजासह उतरणार की तीन फिरकी गोलंदाजासह उतरणार... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. अनेकांच्या मते अश्विनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. 


मोहम्मद शामी की सिराज ?


तीन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान द्यायचे झाल्यास कोणत्या वेगावान गोलंदाजाला बेंचवर बसावे लागणार.. हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह प्लेईंग 11 मध्ये कायम असेल. पण मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी एका गोलंदाजाला बेंचवर बसवण्याची शक्यता आहे. सिराज भारतीय संघाचा दुसरा प्रमुख गोलंदाज म्हणून विश्वचषकात खेळला, पण न्यूझीलंडविरोधात शामीने पाच विकेट घेत आपली दावेदारीही भक्कम केली आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा कुणाला बेंचवर बसवणार.. हे पाहणं औत्सुक्याचे असेल. 


भारताची प्लेईंग 11 कशी असेल - 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव