Ian Chappell on Indian Pitches : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 चा (BGT 2023) तिसरा सामना अडीच दिवसही व्यवस्थित चालू शकला नाही. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटीत पहिल्या दिवसापासूनच फलंदाज इतक्या पटापट बाद होत होते की, पहिल्या दोन दिवसांतच 30 विकेट्स पडल्या. हे पाहता आयसीसीनेही इंदूरच्या खेळपट्टीला खराब रेटिंग दिलं आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेलने (Ian chappell) या खेळपट्टीवरुन टीम इंडियाला फटकारलं आहे.


इयान चॅपेलने भारतीय संघाच्या हस्तक्षेपावर टीका करताना म्हटलंय की, कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत यजमान संघाला स्वतःच्या आवडीनुसार खेळपट्टी तयार करता येते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही चार सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळवली जात असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सांगण्यावरूनच खेळपट्टी तयार केली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच इंदूरमध्येही भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात पटाईत आहेत, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फिरकी खेळणं तितकसं जमत नाही. मात्र, हा सट्टा भारतीय संघासाठी उलटला. नागपूर आणि दिल्लीप्रमाणेच इंदूरची खेळपट्टीही थोडी फारच फिरकीला अनुकूल ठरली आणि पहिल्या डावात फक्त भारतीय संघ असा पटापट बाद झाला की की नंतरच्या डावांत भारताला पुनरागमन करता आले नाही. आपल्याच जाळ्यात अडकलेल्या भारतीय संघाला आता खेळपट्टीच्या तयारीत हस्तक्षेप करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला इयान चॅपेलने दिला आहे. खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी फक्त खेळपट्टी क्युरेटर्सवर सोडली पाहिजे, असंही त्यानं म्हटलं आहे.


'टीम इंडिया खेळपट्टीबद्दल स्वतःचे इनपूट का देते?'


इयान चॅपल म्हणाला, 'भारतीय संघाने त्यांच्या चुकांकडे लक्ष दिलं पाहिजे. भारतीय संघाला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांबद्दल मी याआधीही बोललो होतो आणि अजूनही सांगतोय. ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत हे भारतीय संघ विसरला का? संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्युरेटर याशिवाय इतर सर्वजण काय करत होते? खेळपट्टी तयार करण्याच्या बाबतीत संघ आपले इनपूट का देत होतं? ही बाब खेळपट्टीच्या क्युरेटर्सवर सोडायची आहे. त्यांना अशी खेळपट्टी तयार करू द्या, जी त्यांच्या मते कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम असेल.


पहिले दोन्ही सामने तीन दिवसात संपले


दिल्ली आणि नागपूर कसोटी सामनेही तीन-तीन दिवसांत संपले आणि आता इंदूरमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. मात्र, पहिल्याच दिवसापासून इंदूरच्या खेळपट्टीवर एक विचित्र वळण पाहायला मिळाल्याचे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.     


हे देखील वाचा-