Hardik Pandya Injury Update : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अपडेट दिली आहे. हार्दिक पांड्याला पुण्यात बांगलादेशविरोधातील सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला होता. आता त्याच्या प्रकृतीविषयी बीसीसीआयने माहिती दिली आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरोधात खेळणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे.


हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर नाही -


बांगलादेशविरोधात पुण्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी हार्दिक पांड्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम हार्दिक पांड्यावर लक्ष ठेवून आहे.  हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत 20 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे जाणार नाही. हार्दिक पांड्या लखनौमध्ये टीम इंडियासोबत जोडला जाईल. लखनौमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. 


हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार त्याची दुखापत गंभीर दिसत नाही. हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत पुढील सामन्याला उपलब्ध असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लखनौ येथे सामना होणार आहे. त्यासाठी हार्दिक पांड्या उपलब्ध असेल. न्यूझीलंडविरोधात रविवारी होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नसेल. 






रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबद्दल काय म्हणाला होता?
पुण्यातील सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. हार्दिक पांड्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे रोहित शर्माने सांगितले होते. हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध नववे षटक टाकण्यासाठी आला होता, पण तो फक्त 3 चेंडू टाकू शकला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. हार्दिक पांड्याच्या ओव्हरचे उर्वरित 3 चेंडू विराट कोहलीने टाकले.


भारताचा विजयी चौकार - 


IND vs BAN, World Cup 2023 : चेसमास्टर विराट कोहलीने पुण्याच्या मैदानावर शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने सात विकेट आणि 51 चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान भारताने 41.3 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने शतकी खेळी केली. तर शुभमन गिल याने अर्धशतक ठोकले. 


आता लढत न्यूझीलंडविरोधात -


वर्ल्डकपमध्ये गुणतालिकेत न्यूझीलंड चार विजयांसह अव्वल स्थानी आहे, तर भारत सुद्धा चार सामन्यात विजयी झाला असला, तरी दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची धावगती भारतापेक्षा किंचित सरस आहे. त्यामुळे अव्वल दर्जाचे संघ 22 ऑक्टोबर रोजी आमनेसामने राहिले आहेत. न्यूझीलंड नेहमीच वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सरस राहिला आहे. 2019 मध्येही वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला मात दिली होती. त्यामुळे या सामन्यात इतिहास पुसून टाकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.