India tour of New Zealand 2022 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान पांड्या (Hardik Pandya) या मालिकेत युवा खेळाडू काय कमाल करु शकतात हे पाहण्यासाठी खूप उत्सुक असून त्याने युवा खेळाडूंबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या दौऱ्यात संघात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर केएल राहुल, स्टार फलंदाज विराट कोहली, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक, ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन असे प्रमुख खेळाडू नसणार असून त्यांच्याजागी सलामीवीर शुभमन गिल, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, वेगवान गोलंदाज उमरान मलिक, ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना पांड्या म्हणाला, "मुख्य खेळाडू इथे नाहीत. पण त्याच वेळी, जे खेळाडू इथे आहेत, ते जवळपास दीड-दोन वर्षांपासून भारताकडून खेळत आहेत. त्यांना पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे आता हे सर्व जण काय कमाल करतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'' हार्दिकने बुधवारी मालिकेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
कसं आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक?
टी-20 मालिकेच वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च |
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.