Kuldeep Sen in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आधी तीन टी20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी दिली असून कुलदीप सेनचीही भारतीय संघात निवड झाली आहे. रणजी करंडक, इराणी करंडक आणि भारत 'अ' संघांसाठी दमदार कामगिरी केल्यानंतर कुलदीपला ही संधी मिळाली आहे. दरम्यान आयपीएल 2022 मध्येही तो चमकला होता, ज्यानंतर त्याला ही मोठी संधी मिळाल्यामुळे त्यालाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं त्यानं सांगितलं.


तर युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनची ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषकादरम्यान नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. पण व्हिसा मंजूर न झाल्याने तो वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आता मात्र तो न्यूझीलंडमध्ये मालिकेसाठी सज्ज झाला असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळते का? हे पाहावे लागेल. दरम्यान भारतीय संघात निवडीनंतर कुलदीप सेनने दैनिक भास्करशी खास बातचीत केली. यावेळी कुलदीप म्हणाला की, 'इतक्या लवकर मला टीम इंडियामध्ये संधी मिळेल असे वाटले नव्हते. मी फक्त विचार करत होतो की इराणी ट्रॉफी आणि भारत 'अ' संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे काहीतरी चांगले घडू शकते. पण इतक्या लवकर संधी मिळेल याची खात्री नव्हती. विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ न शकल्याने मी निराश झालो होतो, पण मी पुन्हा मुश्ताक अली ट्रॉफीवर लक्ष केंद्रित केले. देशांतर्गत सामन्यांनंतर मी एनसीएमध्ये प्रशिक्षणासाठी गेलो आणि नंतर जेव्हा निवडीसाठी फोन आला तेव्हा मला खूप आनंद झाला. मी कुटुंबाचा आणि कठीण काळात मला मदत करणाऱ्यांचा फार आभारी आहे.'


न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:


शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.


हे देखील वाचा-