Hardik Pandya India vs England 4th T20I : हार्दिक पांड्या जेव्हा मैदानावर असतो तेव्हा नेहमीच अॅक्शन दिसतो, पुण्यातही असेच काहीसे दिसून आले. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 53 धावा केल्या. टीम इंडिया अडचणीत असताना त्याच्या बॅटमधून ही खेळी आली. पांड्याने क्रीजवर येताच तुफानी फटकेबाजी सुरू केली आणि फक्त 27 चेंडूत अर्धशतक ठोकले. राजकोट टी-20 मध्ये त्याच्या संथ खेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, पण हार्दिक पांड्याने पुण्यात वचपा काढला.
हार्दिक पांड्याने राजकोट टी-20 मध्ये 40 धावा केल्या पण त्याने 35 चेंडू खेळले होते. त्याचा स्ट्राईक रेट 120 पेक्षा कमी होता. मोठी गोष्ट म्हणजे त्याने शेवटच्या षटकांमध्ये ध्रुव जुरेलला स्ट्राईक दिला नाही आणि त्यानंतर तो स्वतःही आऊट झाला. हार्दिकच्या या खेळीनंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने तर असे म्हटले की, पांड्याने सेट होण्यासाठी इतके चेंडू घेऊ नयेत. कदाचित पांड्यानेही तेच ऐकले.
पांड्याची जबरदस्त फटकेबाजी
हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या खेळाडूने चार षटकार मारले आणि त्यापैकी दोन साकिब महमूदच्या चेंडूवर लागले. हा तोच गोलंदाज आहे ज्याने त्याच्या पहिल्याच षटकात टीम इंडियाचे तीन विकेट घेतले होते. यानंतर, पांड्याने जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटनच्या चेंडूवरही षटकार मारले.
पांड्यानंतर दुबेने ठोकले अर्धशतक
हार्दिक पांड्याने केवळ शानदार फलंदाजी केली नाही तर, शिवम दुबेनेही उत्तम कामगिरी केली. या सामन्यात त्याने अर्धशतकही झळकावले आणि त्यानेही 53 धावा केल्या. पांड्या आणि दुबे यांच्यात 45 चेंडूत 87 धावांची भागीदारी झाली. त्यांच्यामुळेच भारतीय संघाने 181 धावांचा टप्पा गाठला. याआधी संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव एकाच षटकात बाद झाल्यामुळे टीम इंडियावर दडपण आले होते. पण तरीही शिवम आणि पांड्याने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
हे ही वाचा -