नवी दिल्ली :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजानाचा मान पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार भारताच्या सर्व मॅचेस सुरक्षेच्या कारणावरुन लाहोरमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून हाय व्होल्टेज मॅच 1 मार्चला लाहोरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. एका लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंग (Harbhajan Singh ) पाकिस्तानच्या माजी खेळाडूंवर भडकल्याचं पाहायला मिळालं. 


पीसीबीनं तयार केलेल्या वेळापत्रकाला आतापर्यंत आयसीसीनं अजून मान्यता दिलेली नाही. बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला न पाठण्याची भूमिका घेतली आहे. भारताच्या मॅचेस त्रयस्थ ठिकाणी घेण्यात याव्यात अशी भूमिका बीसीसीआयनं घेतला आहे. पाकिस्तानच्या काही दिग्गज खेळाडूंनी एका लाईव्ह शोमध्ये भारतानं पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी टीम पाठवावी, असं म्हटलं. वर्ल्ड कप असेल तर भारत पाकिस्तानात येणार नाही का असा सवाल हरभजन सिंगला विचारण्यात आला. यावर हरभजन सिंग भडकला. हरभजन सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हरभजन सिंग लाईव्ह शो दरम्यान भडकला


हरभजन सिंगनं एका पाकिस्तान चॅनेलवर लाईव्ह शोमध्ये त्याची बाजू मांडली. " आमचे खेळाडू पाकिस्तानात सुरक्षित नसतील तर आम्ही आमची टीम पाठवणार नाही. तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा, तुम्हाला नसेल खेळायचं तर नका खेळू, भारतीय क्रिकेट पाकिस्तानशिवाय जिवंत राहू शकतं. तुमचं क्रिकेट भारताशिवाय जिवंत राहत असेल तर खेळा, असं हरभजन सिंगनं सुनावलं. 




भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत


माध्यमातील काही रिपोर्टस नुसार भारतीय क्रिकेट संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित केले जाऊ शकतात. एएनआयच्या रिपोर्टनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआय भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याबाबत आयसीसी सोबत चर्चा करणार आहे. बीसीसीआयनं  याबाबत अद्याप अधिकृत भूमिका मांडलेली नाही.  


पीसीबीच्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी कधी होणार?


पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तयार केलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान केलं जाणार आहे. पीसीबीनं आयसीसीला वेळापत्रकाचा आराखडा सादर केला आहे. लाहोरमध्ये 7, रावळपिंडीत 5 आणि कराचीत 3 मॅच आयोजित केल्या जाणार आहेत. पीसीबीच्या आराखड्यानुसार 1 मार्चला भारत आणि पाकिस्तान मॅच लाहोरमध्ये करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. मात्र, आयसीसीनं त्याला मंजुरी दिलेली नाही. 


संबंधित बातम्या : 



यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात