Sachin Tendulkar Birthday मुंबई: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असलेल्या भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा (Sachin Tendulkar) आज 51 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला होता. सचिन लहानपणी टेनिस आणि क्रिकेट खेळायचा. मात्र, पुढं जाऊन त्यानं क्रिकेटमध्ये जगभरात आपलं स्वत:चं स्थान निर्माण केलं. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजारांहून अधिक धावा, 100 शतकं, 164 अर्धशतकं केली आहेत. सचिननं शोएब अख्तर, ब्रेट ली, ग्लेन मॅक्ग्राथ, शेन वॉर्न या सारख्या दिग्गज गोलंदाजांपुढं खूप धावा काढल्या होत्या.  


भावाचा त्याग


सचिन तेंडुलकर यानं स्वत: सांगितलं होतं की त्यानं आणि भाऊ अजित तेंडुलकर यानं एकत्र क्रिकेटचं स्वप्न जगलं आहे. अजित तेंडुलकर यानेच सचिनमधील क्रिकेटची प्रतिभा ओळखली होती. सचिनचं क्रिकेट करिअर पुढं जावं म्हणून अजित तेंडुलकर यानं क्रिकेट करिअरचा त्याग केला होता. ही गोष्ट सचिन तेंडुलकर ११ वर्षाचा असतानाची आहे. अजित तेंडुलकर यानं सचिन तेंडुलकरला त्यांचे कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडे नेलं होतं. पहिल्या प्रयत्नात सचिनला रमाकांत आचरेकर यांना आपली कामगिरी दाखवण्यात अपयश आलं होतं. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात सचिननं रमाकांत आचरेकर यांचा विश्वास संपादन केला. 


'Sachin: A Billion Dreams' डॉक्यूमेंट्रीमध्ये अजित तेंडुलकरनं सचिन तेंडुलकरच्या प्रतिभेला ओळखून महान क्रिकेटपटू बनवण्याचा पाया रचल्याचं दाखवण्यात आलं आहे. भावाच्या मदतीमुळेच सचिननं वयाच्या 16 व्या वर्षी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दोन्ही भावांनी भारताकडून एकाचवेळी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, अजित तेंडुलकर यानं सचिनसाठी क्रिकेट करिअरचा त्याग केला. सचिन तेंडुलकरनं म्हटलं की रमाकांत आचरेकर यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर  जीवन बदलून गेलं. क्रिकेटमध्ये जी कामगिरी केली ती सर्व सचिननं त्याचा भाऊ अजित तेंडुलकर यांना समर्पित केली.  


सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाचं 200 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. सचिनच्या नावावर शंभर शतकांची नोंद आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या आहेत. सचिनं वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. सचिननं 200 कसोटी सामन्यात 15921 धावा, 463 वनडेमध्ये 18426  आणि एका टी 20 मॅचमध्ये 10  धावा केल्या आहेत. 


वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 24 फेब्रुवारी 2010  रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं द्विशतक केलं होतं. वनडे क्रिकेटच्या सहा वर्ल्डकपमध्ये सहभागी होणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा सचिन प्रमुख सदस्य होता.  


दरम्यान, सचिन तेंडुलकरनं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 78 मॅच खेळल्या त्यामध्ये त्यानं एक शतक  आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत.


संबंधित बातम्या :



 आयपीएलच्या 17 वर्षाच्या इतिहासात कोणालाच जमलं नाही, ते चेन्नईसाठी कॅप्टन ऋतुराजनं करून दाखवलं