Gongadi Trisha U19 Women's T20 World Cup : 19 वर्षाच्या भारताच्या पोराने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. खरंतर, आयसीसी अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप सध्या मलेशियामध्ये आयोजित केला आहे. या स्पर्धेत भारतासह एकूण 16 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा 18 जानेवारी रोजी सुरू झाली असून आता फक्त 6 संघ सुपर सिक्स फेरीत पोहोचू शकले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. सुपर सिक्स फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवले. आता भारताचा दुसरा सामना स्कॉटलंडशी होते आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर गोंगाडी त्रिशाने तुफानी शतक ठोकून एक नवा विश्वविक्रम रचला आहे.
पहिल्यांदाच ठोकले शतक
मलेशियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सुपर-6 फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून जी कमलिनी आणि जी त्रिशा यांनी डावाची सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासूनच स्कॉटलंड गोलंदाजांविरुद्ध तूफानी शैलीत फटकेबाजी सुरू केली. भारताला पहिला धक्का कमलिनीच्या रूपात 147 धावांवर बसला. तिने 42 चेंडूत 51 धावा केल्या. त्रिशा आणि कमलिनी यांनी पहिल्या विकेटसाठी फक्त 13.3 षटकांत 147 धावांची भागीदारी केली.
यानंतर, गोंगाडी त्रिशाने आयसीसी अंडर 19 महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये 18 व्या षटकात शतक झळकावून नवा इतिहास रचला. गोंगाडी त्रिशा ही 19 वर्षाखालील महिला टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात शतक झळकावणारी जगातील पहिली खेळाडू ठरली. याआधी एकाही फलंदाजाला 100 धावांचा टप्पा गाठता आला नव्हता.
भारताने दिले 209 धावांचे लक्ष्य
युवा सलामीवीर गोंगाडी त्रिशाने 59 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांसह 110 धावा काढत नाबाद राहिली. तिच्या खेळीमुळे भारताने 20 षटकांत एका गडी गमावून 207 धावांचा मोठा धावसंख्या उभारला. 5 सामन्यांमध्ये त्रिशाने 53 च्या सरासरीने आणि 120.45 च्या स्ट्राईक-रेटने 159 धावा केल्या आहेत, ज्यामुळे भारताला सलग विजय मिळवून देण्यात मदत झाली. त्रिशा सध्या सुरू असलेल्या मेगा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू देखील आहे.
त्रिशा गेल्या अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होती. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिने 23.20 च्या सरासरीने आणि 108.41 च्या स्ट्राईक रेटने 116 धावा केल्या, ज्यामध्ये तिचा सर्वोच्च धावसंख्या 57 होती.
महिला 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
110* (59) – गोंगडी त्रिशा विरुद्ध स्कॉटलंड, 2025
93 (56) - ग्रेस स्क्रिव्हेन्स विरुद्ध आयर्लंड, 2023
92* (57) – श्वेता सेहरावत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023