AUS Vs SL 1st ODI : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामना रोमांचक झाला. पावसामुळे या सामन्यात अडथळा आला होता. पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाकडून अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने मोक्याच्या क्षणी 80 धावांची खेळी करत सामना पलटवला. ग्लेन मॅक्सवेलने 51 चेंडूत 80 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेय.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 300 धावा केल्या. श्रीलंकेची फलंदाजी झाल्यानंतर पावसाने उपस्थिती दर्शवली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. पण डकवर्थ लुईस नियमांप्रमाणे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 षटकात 282 धावांचे आव्हान देण्यात आले.
282 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात विस्फोटक डेविड वॉर्नर एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फिंचने स्मिथसोबत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी स्मिथ-फिंच यांनी 67 धावांच भागिदारी केली. फिंच 44 धावा काढून माघारी परतला. स्मिथने अर्धशतकी खेळी (53) केली. लाबुशेनने 24, स्टोयनिसने 44 आणि कॅरीने 21 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात ठेवलं. पण 35.3 षटकात ऑस्ट्रलेलिया सात बाद 228 धावा होत्या. सामना श्रीलंकेच्या बाजूने होता. पण त्याच वेळी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आले.
ग्लेन मॅक्सवेलने एकट्याच्या जिवावर सामना फिरवला. मॅक्सवेलने मोक्याच्या क्षणी 51 चेंडूत 80 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सवेलने सहा षटकार आणि सहा चौकारही लगावले. मॅक्सवेलच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 9 चेंडू राखून सामना जिंकला. श्रीलंकाकडून वानंदु हसरंगाने चार विकेट घेतल्या. त्याआधी प्रथम फंलदाजी करताना श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने 86 धावांची नाबाद खेळी केली. त्याशिवाय निशंकानेही अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन याने 19 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.