Gautam Gambhir Pahalgam Attack : भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना 'आयसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवारी, त्याने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआरसाठी औपचारिक तक्रार दाखल केली. त्याने कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गौतम गंभीरने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, भारत या कृत्याला प्रत्युत्तर देईल. गंभीर यांनी X वर लिहिले होते की, मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पण, उघडकीस आल्यानंतरही पाकिस्तान अजूनही म्हणत आहे की, या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा कोणताही सहभाग नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी चौकशीसाठी शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे.

पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बोलावली बैठक 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय सीसीएस बैठकीचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज म्हणजे 24 एप्रिल रोजी आहे. 

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे गौतम गंभीर सध्या टीम इंडियापासून ब्रेकवर आहे. अलिकडेच तो त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. पण पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर त्याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. 

आयपीएल नंतर इंग्लंड दौरा

आयपीएलनंतर टीम इंडियाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. त्या दौऱ्यातून गौतम गंभीर पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. पण, टीम इंडिया WTC फायनलसाठी पात्र होऊ शकली नाही.