INDIA W vs ENGLAND W : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने प्रथम खेळताना 50 षटकांत केवळ 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग करताना दोन विकेट गमावत 15 ओव्हर्स राखून विजय मिळवला.


इंग्लंडकडून टॅमी ब्यूमॉन्टने नाबाद 87 आणि नताली स्कायव्हरने नाबाद 74 धावांची निर्णायक खेळी केली.  टॅमीने तिच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार ठोकले तर नतालीने 10 चौकार आणि एका षटकार लगावला. इंग्लंडकडून लॉरेन हिलने 16 आणि हेदर नाइटने 18 धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामी आणि एकता बिष्टने प्रत्येकी एक विकेट घेतली. दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टॉन्टनमध्ये खेळला जाईल.


टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने आज आपल्या कारकीर्दीच्या 22 व्या वर्षात प्रवेश केला. तिने आज शानदार अर्धशतक झळकावलं. मितालीच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. मितालीने 108 चेंडूत 72 धावा केल्या. तर पूनम राऊतने 32 तर दिप्ती शर्माने 30 धावांची खेळी केली.  याशिवाय पूजा वस्त्राकरने आणि शेफाली वर्मा यांनी 15-15 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी इक्लेस्टनने तीन तर कॅथरीन ब्रंट आणि अॅन्या सुब्रसोल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


शेफाली वर्माने रचला इतिहास


भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने रविवारी इतिहास रचला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. यासह ती क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट, टी-20) सर्वात कमी वयात खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. शेफाली वयाच्या 17 वर्ष आणि 150 दिवसांनी तिचा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. मात्र पहिल्या सामन्यात ती जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकली नाही. ती केवळ 15 धावा करुन बाद झाली. याशिवाय शेफालीने वयाच्या 15 वर्ष 239 दिवसाची असताना पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच 17 वर्ष आणि 139 दिवसांची असताना तिने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. शेफालीने आतापर्यंत 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला आहे. यासह शेफालीने अवघ्या 17 व्या वर्षी आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.