नवी दिल्ली : भारतानं (India) इंग्लंडला (England) 68 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्न विकेट गमावल्या. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीपुढं इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. भारतानं विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. इंग्लंडकडे आता किमान यूरो कप जिंकण्याची संधी आहे, असं मायकल वॉन म्हणाले आहेत.
इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅच संदर्भात त्यांची मतं व्यक्त केली आहेत. भारताविरुद्ध पराभव झाल्यानं इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं त्यांचं आव्हान संपुष्ठात आलं. आपण अजूनही यूरो कप जिंकू शकतो, असं मायकल वॉननं म्हटलं आहे. यूरो फुटबॉल स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची संधी आपल्याकडे आहे, असं मायकल वॉननं म्हणत जोस बटलरच्या टीमची फिरकी घेतली आहे.
इंग्लंडनं ती मॅच जिंकली असती तर
भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपलं. माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी इंग्लंडच्या टीमच्या कामगिरीवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की जोस बटरच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर त्यांना त्रिनिदाद मध्ये सेमी फायनल खेळण्याची संधी मिळाली असती. इंग्लंडनं तिथं विजय मिळवला असता तर ते अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचले असते. भारतासाठी गयानाचं ग्राऊंड चांगलं होतं, असं देखील मायकल वॉन म्हणाले.
गतविजेत्यांचं आव्हान संपलं
इंग्लंडनं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. इंग्लंडनं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी इंग्लंडचा सुपर 8 मधील प्रवेश ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडला पराभूत केल्यानं झाला होता. सुपर 8 मध्ये इंग्लंडनं दमदार कामगिरी केल्यानं त्यांनी वेस्ट इंडिजला मागं टाकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडसमोर यावेळी भारताचं आव्हान होतं. भारतीय संघ 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा रोहित शर्माच्या टीमनं काढला. इंग्लंडला 103 धावांवर बाद करत भारतानं 68 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 29 जूनला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता अंतिम फेरीची लढत सुरु होईल.
संबंधित बातम्या :