ENG vs PAK: कोरोनामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका अडचणीत आली आहे. सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे देण्यात आले आहे. संघात नऊ अनकॅप्ड खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका 8 जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच इंग्लंडचे तीन खेळाडू आणि चार व्यवस्थापन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता इंग्लंडचा नवा संघ घोषित करण्यात आला आहे.


इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मंगळवारी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी त्यांनी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ईसीबीने म्हटले आहे की, "स्टोक्स परत आला आहे आणि तो संघाचा कर्णधार असेल, तर काही काळ मर्यादित षटकांच्या मालिकेपासून दूर असलेला ख्रिस सिल्व्हरवूडही मुख्य प्रशिक्षकपदावर परत येईल. एकूण नऊ अनकॅप्ड खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे.


पाकिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर तीन टी-20 मालिकाही होणार आहे. वेळापत्रकानुसार पाकिस्तान दौर्‍याची सुरुवात गुरुवारी कार्डिफमध्ये एकदिवसीय सामन्याने होईल.


इंग्लंडचा नवीन एकदिवसीय संघ खालीलप्रमाणे
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बॉल, डेनी ब्रिग्ज, ब्रायडन कार्से, जॅक क्रॉली, बेन डकेट, लुई ग्रेगोरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, साकीब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पायने, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन आणि जेम्स व्हिन्स.