Dinesh Karthik: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. दिनेश कार्तिक हा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. या लीगचा संघ पार्ल रॉयल्सने दिनेश कार्तिकसोबत करार केला आहे.
दिनेश कार्तिकने मागील हंगामात आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर तो आता दक्षिण आफ्रिकन टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात लायन्सचा भाग होता.
दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
26 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, दिनेश कार्तिकने 94 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये दिनेश कार्तिकने कसोटी सामन्यात 25 च्या सरासरीने 1025 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतकाव्यतिरिक्त 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, दिनेश कार्तिकने वनडे फॉरमॅटमध्ये 73.24 च्या स्ट्राइक रेट आणि 30.21 च्या सरासरीने 1752 धावा केल्या. ज्यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय दिनेश कार्तिकने भारतासाठी 60 टी-20 सामन्यांमध्ये 142.62 च्या स्ट्राइक रेटने आणि 26.38 च्या सरासरीने 686 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमधील सर्वोत्तम धावसंख्या 55 धावा होती.
आयपीएलमध्ये सहा संघाकडून खेळला-
दिनेश कार्तिक 2024 चा हंगामात आरसीबी संघाचा सदस्य राहिला. 2015 मध्येही तो आरसीबीचा सदस्य होता. 2016 च्या हंगामासाठी त्याला आरसीबीने रिलिज केले होते. त्यांतर पुन्हा त्याला ताफ्यात घेतले होते. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकनं आतापर्यंत सहा संघाचे प्रतिनिधित्व केलेय. दिल्ली डेयरडेविल्स (2008-14), किंग्स इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्स 2011), मुंबई इंडियन्स (2012-13), गुजरात लायन्स (2016-17), कोलकाता नाइट राइडर्स (2018-21) आणि आरसीबी (2015, 2022-आतापर्यंत) या सहा संघाकडू दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये खेळला आहे.
समालोचक म्हणून काम -
भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळणं कठीण झालं, तेव्हा दिनेश कार्तिकनं दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. दिनेश कार्तिक यानं समालोचक म्हणून काम केलं. दिनेश कार्तिक आता चांगला ब्रॉडकास्टर म्हणून प्रसिद्ध झाला आहे.