लंडन : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात झालेल्या नाचक्कीतून ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांनी धडा घेतलेला नाही, असं चित्र आहे. आता ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झॅम्पा भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातल्या त्याच्या हालचालींनी संशयाच्या जाळ्यात अडकला आहे.


लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना झॅम्पा खिशातून काहीतरी काढून ती गोष्ट चेंडूवर घासताना दिसत आहे. झॅम्पाची ही क्लिप आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हा बॉल टॅम्परिंगचाच प्रकार आहे का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होताना दिसत आहे.


ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं बॉल टेम्परिंग
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमरुन बॅनक्रॉफ्टने मागील वर्षी केपटाऊन कसोटीत सॅण्डपेपरचा वापर करुन चेंडूसोबत छेडछाड केली होती, तसाच प्रकार झॅम्पाने केल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ दोषी सिद्ध झाले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची तर बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांदी बंदी घालण्यात आली होती.

शिखर धवन, रोहित शर्मासमोर झॅम्पाची शरणागती
दरम्यान, भारताविरुद्धच्या या सामन्यात 27 वर्षीय झॅम्पाने सहा षटकं गोलंदाजी केली, पण 50 धावा देऊन त्याला एकही विकेट घेता आली नाही. झॅम्पाने पहिला पॉवर प्ले संपल्यानंतर आपलं पहिल षटक टाकलं आणि त्यानंतर मिडल ओवर्समध्ये गोलंदाजी केली. त्याने विश्वचषकातील आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. परंतु शिखर धवन आणि रोहित शर्मासमोर तो तग धरु शकला नाही.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन, इंग्लंडमधल्या विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. ओव्हलवरच्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सर्व बाद 316 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि अॅलेक्स कॅरीने अर्धशतकं झळकावली. पण तरीही ऑस्ट्रेलिया संघ विजयापासून 36 धावांनी दूर राहिला.