मुंबई : 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंह आज निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आज दुपारी एक वाजता तो राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत विचार करत असल्याचं बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतंच सांगितलं होतं.
युवराज यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु त्याला बऱ्याच सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारतीय संघात त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तर युवराजचं 2012 नंतर टीममध्ये कमबॅकच झालेलं नाही. त्यामुळे तो आपल्या भविष्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
निवृत्तीनंतर युवराज आयसीसीची मंजुरी असलेल्या स्वीकृत परदेशी टी-20 लीगमध्ये फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून खेळू शकतो. बीसीसीआय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "टी-20 ला आयसीसीची मंजुरी मिळाली असली तरी त्याला योग्य प्रारुप मिळालेली नाही. पण पुढे जेव्हा खेळाडूंचा संघ आकार घेईल, तेव्हा निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंबाबत विचार होऊ शकतो."