वाराणासी : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, फलंदाज शिखर धवन हा त्याच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जातो. शिखर धवन यानं आजवर त्याच्या दमदार खेळीनं क्रीडारसिकांची मनं कायम जिंकली आहेत. पण, आता मात्र हाच क्रिकेटपटू एका वेगळ्या कारणामुळं अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. याला कारण ठरत आहे त्याची एक सोशल मीडिया पोस्ट.


वाराणासीहून परतलेला हा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वाराणासीमध्ये नौकानयनाचा आनंद घेणाऱ्या शिखर धवन यानं तिथं काही पक्ष्यांना दाणे खायला दिले होते. पण, शिखरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोंची वाराणासीच्या जिल्हा प्रशासन कार्यालयानं दखल घेतली. ज्यानंतर जिल्हा प्रशासकीय अधिकारी कौशलराज शर्मा यांनी बोट चालवणाऱ्यावर कारवाईची तयारी केली आहे. ज्या नावेनं शिखर नौकाविहार करत होता, त्या नाविकावर कारवाई सुरु करण्यातही आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शिखरवर कोणती कारवाई केली जाणार का याबाबत मात्र स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.


IPL मध्ये RCBच्या 'या' खेळाडूची 100 कोटींहून अधिक कमाई


बर्ड फ्ल्यूच्या काळात परदेशी पक्ष्यांना खायला देण्यावर बंदी आहे. सध्याच्या घडीला देशात बर्ड फ्ल्यूचं थैमान पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, त्यातच आता शिखरचा हा फोटो समोर आल्यामुळं आता त्यानं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.





बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाचा धोका पाहता कौशलराज शर्मा यांनी 11 जानेवारीपासून गंगा नदीमध्ये परदेशी पक्ष्यांना खाऊ घालण्यावर बंदी आणत शहर प्रशासन आणि जल वाहतूक पोलिसांना यावर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. समाजात जनजागृती, स्वच्छतेचे निकष यांवर लक्ष देण्यासोबतच एखादा पक्षी मृतावस्थेत आढळल्यास किंवा पशू- पक्षी सामुहिक मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी तातडीनं प्रशासनाला याची माहिती देण्याचं आवाहन केलं होतं.