Bangladesh vs Australia 3rd T20: बांगलादेशच्या क्रिकेट संघानं नवा इतिहास घडवला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत सलग तीन टी 20 सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. ढाका येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत बांगलादेशनं हा इतिहास नोंदवला आहे.
पहिल्यांदाच बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली
इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली आहे. याआधी बांगलादेशने आपल्या क्रिकेटच्या इतिहासात कधीही ऑस्ट्रेलियाला नमवत कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात मालिका जिंकलेली नव्हती.
पहिल्यांदाच जिंकले सलग तीन सामने
सोबतच बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन टी 20 सामने जिंकले आहेत. बांगलादेश टीमनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात सलग तीन सामने जिंकण्याचा पराक्रम देखील केला आहे.
तिसऱ्या सामन्यात कमी धावसंख्या असतानाही जिंकले
तिसऱ्या सामन्यात बांगलादेशनं ऑस्ट्रेलियासमोर 128 धावांचे हे माफक आव्हान ठेवले होते. महमुदुल्लाहने चार चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी करत 127 धावांपर्यंत पोहोचवले. महमुदुल्लाहला यावेळी बांगलादेशच्या अन्य फलंदाजांकडून जास्त चांगली साथ मिळाली नाही. पण तरीही महमुदुल्लाहने एकतर्फी किल्ला लढवत अर्धशतकी खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने यावेळी तीन विकेट्स तर जोश हेझलवूड आणि अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाला 20 षटकांमध्ये केवळ 117 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाची स्थिती 1 बाद 8 अशी झाल्यानंतर बेन मॅकडरमॉट आणि मिचेल मार्श यांची चांगली भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी 63 धावांची भागीदारी केली. पण यावेळी बेन बाद झाला आणि ही जोडी फुटली. बेनने 35 धावा केल्या. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्श वगळता कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 51 धावा केल्या. मार्श बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना निसटला. ऑस्ट्रेलियाला 20 षटकांमध्ये 117 धावा करता आल्या आणि बांगलादेशने 10 धावांनी विजय साकारला.