T20 World Cup 2021: संयुक्त अरब अमीरात (यूएई) आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार सुरु झाला आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करत स्कॉटलँडनं मोठा उलटफेर केला. तर दुसऱ्या सामन्या पापुआ न्यू गिनीचा पराभव करत सुपर-12 मध्ये स्थान जवळपास निश्चित केलं. स्कॉटलँड आपल्या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एकीकडे आपल्या कामगिरीनं स्कॉटलँड चर्चेत असतानाच 12 वर्षाची चिमुकलीच्या नावानं क्रीडा विश्वात नाव कमावलं आहे. चिमुकलीनं स्कॉटलँड क्रिकेट टीमची जर्सी डिझाईन केली आहे. क्रिकेट स्कॉटलँडनं ट्विट करत विश्वचषकासाठी संघाची जर्सी करणाऱ्या 12 वर्षीय मुलीची माहिती दिली आहे. आयसीसीनेही या मुलीच्या कौशल्याबद्दल कौतुक केलं आहे. रेबेका डाउनी असं त्या 12 वर्षीय मुलीचं नाव आहे. मंगळवारी पापुआ न्यू गिनीविरोधातील सामन्यादरम्यान क्रिकेट स्कॉटलँडनं ट्विटवर रेबेका डाउनी हिनं संघाची जर्सी डिझाईन केल्याचं सांगितलं. त्यासोबत त्या चिमुकलीचा फोटोही पोस्ट केला आहे. स्कॉटलँड संघानं रेबेका डाउनी हिचं आभार मानले आहेत.  


स्कॉटलँड क्रिकेटने आपल्या आधिकृत ट्विटर खात्यावर रेबेका डाउनी हिचा फोटो पोस्ट करत म्हटले, '12 वर्षाच्या रेबेका डाउनी स्कॉटलँड क्रिकेट टीमच्या जर्सीची डिझाईनर आहे. ती टीव्हीवर सामना पाहात संघाचं मनोबल वाढवत आहे. स्वत: डिझाईन केलेली जर्सी तिने अभिमानाने परिधान केली आहे. आम्ही पुन्हा तुझे आभार मानतो. धन्यवाद, रेबेका।' 






डाउनीच्या या कर्तुत्वाबाबात आयसीसीला समजलं. त्यानंतर आयसीसीनं ट्विट करत तिचं कौतुकं केलं. आयसीसीनं आपल्या आधिकृत ट्विटर खात्यावर म्हटलं की, 'खूप मस्त जर्सी आहे. मस्त काम केलेय रेबेका.'







रेबेकानं डिझाईन केलेली स्कॉटलँड संघाची जर्सी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ही जर्सी जांभळ्या रंगाची आहे, ज्याची रचना एकदम अनोखी आहे. जवळ 200 शाळांमधील मुलांना स्कॉटलँड संघासाठी जर्सी डिझाईन करण्यास सांगण्यात आले होते. हजारो मुलांनी त्यांची रचना सादर केली होती. पण रेबेकाने बनवलेली रचना निवडली गेली. रेबेका स्कॉटलँडमधील हॅडिंग्टन या शहराची रहिवासी आहे. रेबेकानं डिझाईन केलेल्या जर्सीला सोशल मीडियातही मोठा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.