Arjun Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) त्याच्या क्रिकेट करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्जुन तेंडुलकर पुढील रणजी हंगामापूर्वी (Ranji Season) मुंबई (Mumbai) संघ सोडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं जे त्याला देण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील देशांतर्गत क्रिकेटचा सीझन तो गोव्यासाठी (Goa) खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाचा भाग असूनही अर्जुन तेंडुलकरला मुंबईसाठी फारसे सामने खेळायला मिळालेले नाहीत, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.
अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल : एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट
एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, "करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुसऱ्या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे नवे पर्व सुरु करत आहे."
फिटनेस चाचणीनंतर गोवा संघात प्रवेश
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांच्या माहितीनुसार, "अर्जुन तेंडुलकरला गोव्यासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळायचे आहे, त्यासाठी त्याच्याशी चर्चा सुरु आहे. विपुल फडके यांच्या म्हणण्यानुसार अर्जुन तेंडुलकरला एमसीएची एनओसी मिळाल्यानंतर त्याची फिटनेस चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला गोवा संघात प्रवेश मिळू शकेल.
अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द
22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर गेल्या मोसमातच मुंबईच्या रणजी संघात सहभागी झाला होता. परंतु सीनियर संघात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळलेला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर यापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाचा भाग होता. तर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा तो सदस्य आहे. मात्र, इथेही अर्जुन तेंडुलकरला गेल्या दोन हंगामात एकही सामना खेळायला मिळालेला नाही. अर्जुनने देशांतर्गत टी-20 स्पर्धा, सईद मुश्ताक अली ट्रॉफीचे दोन सामने मुंबईसाठी खेळले आहेत. त्याने हरियाणा आणि पाँडिचेरीविरुद्ध मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
'या' भारतीय दिग्गजांच्या मुलांनी देखील इतर संघाचं प्रतिनिधित्त्व केलं
अर्जुन तेंडुलकरच्या आधी भारताच्या आणखी एका माजी कर्णधाराचा मुलगा गोव्या संघात सहभागी झाला होता. हा मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा मोहम्मद असदुद्दीनने 2018 च्या हंगामात रणजी ट्रॉफीचे दोन सामने खेळले होते.
याशिवाय सुनील सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन देखील वेगळ्या राज्यासाठी खेळला आहे. रोहन 18 वर्षांचा असताना बंगालला गेला. संघाकडून खेळताना राज्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. एवढंच नाही तर अनेक हंगामात कर्णधारपदही भूषवलं.