Pujara Record in Test Cricket : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करत दिग्गजांट्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून अशी कमाल करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराने आतापर्यंत त्यानं 98 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने 44.64 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत त्यानं 19 शतकं झळकावली आहेत.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं त्याच्या कारकिर्दीतील 19वं कसोटी शतक झळकावलं. या शतकासह त्यानं रॉस टेलर (न्यूझीलंड), गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडिज), क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडिज) आणि माइक हसी (ऑस्ट्रेलिया) यांच्या कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात पुजाराचं अवघ्या 10 धावांनी शतक हुकलं. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो 24 धावा करुनच बाद झाला, पण असं असूनही त्याने 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
सर्वाधिक कसोटी धावा करणारा आठवा भारतीय
भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत चेतेश्वर पुजारा आठव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर सध्या 7008 धावा असून त्याच्या पुढे सौरव गांगुली (7 हजार 212), विराट कोहली (8 हजार 94), वीरेंद्र सेहवाग (8 हजार 586), व्हीव्हीएस लक्ष्मण (8 हजार 781), सुनील गावस्कर (10 हजार 122), राहुल द्रविड (13 हजार 288) आणि सचिन तेंडुलकर (15 हजार 921) आहेत.
मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 1-0 नं आघाडीवर आहे. भारतानं पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतानं दोन बाद 258 धावा करून डाव घोषित केला. दरम्यान, 513 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 324 धावांवर ढेपाळला
हे देखील वाचा-