IND vs BAN 1st Test : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं 188 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने एक खास रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 90 आणि दुसऱ्या डावात नाबाद 102 धावांची शतकी खेळी खेळली. त्याचबरोबर टीम इंडियाच्या विजयासह पुजाराने एक खास विक्रम आपल्या नावावर केला असून सर्वाधिक कसोटी विजयांमध्ये संघासोबत राहिलेला तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने विराटला मागे टाकत हा रेकॉर्ड नावावर केला आहे.
चेतेश्वर पुजारा हा टीम इंडियाचा तिसरा खेळाडू ठरला आहे जो संघात असताना भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत. पुजाराने कोहलीला मागे टाकत हे यश मिळवलं आहे. भारताच्या 54 कसोटी विजयांमध्ये कोहली संघाचा एक भाग आहे. त्याचबरोबर या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. जो भारताच्या 72 कसोटी विजयांमध्ये सोबत होता. तर दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक आणि माजी अनुभवी खेळाडू राहुल द्रविड आहे. टीम इंडियाच्या 56 विजयांमध्ये तो संघाचा भाग होता.
पहिल्याच कसोटीत पुजाराची कमाल
मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणारा चेतेश्वर संघातून कायमचा बाहेर होईल असं वाटत होतं. पण बांगलादेश दौऱ्यात पहिल्यात कसोटीत चेतेश्वर पुजाराने अप्रतिम फलंदाजी करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने टीम इंडियासाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर दुस-या डावात पुजाराने अतिशय वेगवान फलंदाजी करत कसोटी शतक झळकावलं. पुजाराने दुसऱ्या डावात 102 धावांची नाबाद खेळी केली.
भारताचा 188 धावांनी विजय
सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.
हे देखील वाचा-