Chandrayaan 3: चांद्रयान-3चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशासह जगभरातून इस्रोचं (ISRO) अभिनंदन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आणि सर्वच स्तरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. हा ऐतिहासिक क्षण सर्वांनीच लाईव्ह अनुभवला. देशासह जगभरातील मान्यवरांकडून इस्रोचं कौतुक होत आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट संघानेही चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. टाळ्यांच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. बीसीसीआयने खेळाडूंचा हा सुंदर व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.


टीम इंडियाकडून इस्रोचं अभिनंदन


बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन खेळाडूंचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “चंद्रावर भारताचा विक्रम लँडर यशस्वीपणे पोहोचल्याचा आनंद साजरा करताना टीम इंडियाचे खेळाडू…” डबलिन येथून या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला असल्याचं ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.






तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये भारतानं इतिहास रचला, चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.






सचिन तेंडुलकरकडून इस्रोचं कौतुक


भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या सचिन तेंडुलकरने देखील इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा' म्हणत सचिनने इस्रोच्या कामगिरीवर अभिमान व्यक्त केला. पुढे तो म्हणाला, इस्रो ही संघटना सर्वोत्तम भारताचं प्रतिनिधित्व करते. इस्रोतील विनम्र कष्टकरी महिला आणि पुरुषांनी एकत्र येत, प्रत्येक आव्हानांवर मात करत आपला तिरंगा उंच चंद्रावर फडकवला आहे.
 
श्री. एस. सोमनाथ यांच्या चांद्रयान-3 टीमसह श्री. के. सिवन यांच्या नेतृत्वाखालील चांद्रयान-2 टीमचं अभिनंदन केलं पाहिजे, असं सचिन तेंडूलकरने सांगितलं. प्रत्येक हार्ड लँडिंगमध्ये धडे असतात, जे आपल्याला सॉफ्ट लँडिंगच्या जवळ घेऊन जातात-चंद्रावरही आणि खऱ्या जीवनातही... असं सांगत सचिनने इस्रोच्या कामगिरीतून एक प्रकारे जीवनाचा मूलमंत्रच सांगितला.






गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून शायराना अंदाजात अभिनंदन


चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अनोख्या शायराना अंदाजात दोन ओळी लिहील्या आहेत. ज्याच ते म्हणतात, "अब चाँद है हाथों में सुन आये लैला-ए-गती (प्रिय धरती)/हम तेरे लिए तुझ से भी आगे निकल आये."






हेही वाचा:


Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर राज्यभरात जल्लोष; नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण