Chandrayaan 3: चांद्रयानच्या (Chandrayaan 3) यशानंतर राज्यासह देशभरात आनंद साजरा केला जात आहे. चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केली आहे. यामुळे चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या क्षणी वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.


चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगनंतर वर्ध्यात उत्साह


चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगचा वर्ध्यात उत्साह पाहायला मिळाला. यावेळी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांसह अनेकांनी लाईव्ह प्रक्षेपण बघत यशस्वी लँडिंग होताच वर्ध्यात जल्लोष साजरा केला आहे. यावेळी खासदार तडस यांनी लाडू भरवून आनंद व्यक्त केला. चांद्रयान चंद्रावर पोहचण्याचा आनंद सर्वत्र व्यक्त होत असताना वर्ध्यातील हा जल्लोष देखील इस्रोमधील वैज्ञानिकांचं अभिनंदन करणारा आहे.


जळगावातही ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव


चांद्रयान-3ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर जळगावमध्ये मोठा जल्लोष करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ढोल-ताशाच्या गजरात आणि पेढे वाटून जय गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने जळगाव शहरातील नेहरू चौकात हा जल्लोष करण्यात आला. मोठ्या संख्येने तरुण या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषानेने अवघं जळगाव शहर दुमदुमलं.


चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांकडून देखील जळगाव शहरातील त्यांच्या कार्यालयसमोर चांद्रयानची प्रतिकृती साकारून त्या पुढे फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.


नाशिकमध्येही गुंजले 'भारत माता की जय'चे स्वर


चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या मनमाड येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी हातात भारताचा राष्ट्रध्वज घेवून 'भारत माता की जय..वंदे मातरम..हिंदुस्थान जिंदाबाद'च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ आणि तमाम भारतीयांचं यावेळी अभिनंदन करण्यात आलं.


रत्नागिरीतही चांद्रयान मोहिमेच्या यशाचा उत्सव


रत्नागिरीमध्ये देखील चांद्रयान मोहीम यशस्वी ठरल्यानंतर जल्लोष करण्यात आला. रत्नागिरी शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे विद्यार्थी-पालक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रक्षेपण या वेळेला रत्नागिरी शहरातील तारांगण येथे आयोजित करण्यात आलं होतं. विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यानंतर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वांनीच जयघोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी आकाशात फुगे सोडून सर्वांना पेढे भरवून 'भारत माता की जय' अशा घोषणा देत उपस्थित असलेला प्रत्येक जण भारावून गेलेला दिसला.


मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडूनही इस्रोचं अभिनंदन


चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण 'वर्षा' निवासस्थानी  मुख्यमंत्र्यांनी पाहिलं. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल मिठाई वाटून आनंद साजरा केला. 






उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शास्त्रज्ञांचं कौतुक


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सर्वा शास्त्रज्ञांसह संपूर्ण इस्रो टीमचं अभिनंदन केलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, "‘चांद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाली, याचा फार आनंद आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहीम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल."






हेही वाचा:


Chandrayaan 3 : चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा ! म्हणाले...