Ben Stokes as Captain : कसोटी क्रिकेटमध्ये साहेबांच्या 'बॅझबॉल'ची (Bazball) मोठी चर्चा होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि कोच ब्रँडन मॅक्युलम (Brendon Mccullum) या जोडीनं कसोटी क्रिकेटमध्ये नवी ओळख तयार केली होती. अतिआक्रमक क्रिकेट शैलीच्या जोरावर साहेबांनी नवा अध्याय लिहियाला घेतला होता. पण रोहितसेनेनं (Rohit Sharma) साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजवलं आहे. होय. बॅझबॉल आल्यापासून इंग्लंड (Brendon Mccullum Bazball) संघाचा पराभव झाला नव्हता, हा विजयरथ भारताने रोखळा आहे. इंग्लंडची ही अतिआक्रमक शैली भारतापुढे ढेर झाली. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 3-1 ने आघाडी घेतली आहे. रांची कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे. बॅझबॉल क्रिकेट खेळताना इंग्लंडला कसोटी मालिकेत पहिल्यांदाच पराभवाचा झटका बसलाय. 


ब्रँडन मॅक्युलम कोच आणि बेन स्टोक्स कर्णधार असताना इंग्लंड संघानं अतिआक्रमक कसोटी क्रिकेटला सुरुवात केली. त्याला क्रिकेटविश्वात बॅझबॉल या नावानं ओळखलं जात होतं. कसोटी क्रिकेटमध्ये बॅझबॉलची दहशत होती. पाकिस्तान असो अथवा ऑस्ट्रेलिया सर्वजण या अतिआक्रमक क्रिकेटपुढे ढेर झाले होते. पण भारताने इंग्लंडच्या बॅझबॉलचं बँड वाजवलं. बॅझबॉल सुरु झाल्यापासून इंग्लंडनं आतापर्यंत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. पण भारतीय संघानं साहेबांना पाणी पाजलं. इंग्लंडनं बॅझबॉल खेळताना पहिल्यांदाच मालिका गमावली. 


आठव्या मालिकेनंतर मिळाला पराभव -


इंग्लंडनं बॅझबॉल सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच मालिका गमावली. 2022 मध्ये स्टोक्स आणि मॅक्युलम जोडीनं इंग्लंड संघामध्ये अतिआक्रमक शैली रुजवली. दोन वर्षांमध्ये इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी वर्चस्व मिळावलं. पण भारतामध्ये आल्यानंतर इंग्लंडचा विजयरथ थांबलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडच्या बॅझबॉलची वाट लावली. इंग्लंडनं भारतात येण्याआधी सात कसोटी मालिका खेळल्या. त्यामधील तीन मालिका ड्रॉ राहिल्या. तर चार कसोटी मालिकेत विजय मिळवला. पण बॅझबॉल क्रिकेटमध्ये आठवी मालिका गमावली. 


पहिल्यांदा लागोपाठ तीन मालिका गमावल्या - 


हैदराबाद कसोटी मालिका जिंकून इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली. हैदराबाद कसोटी मालिकेत इंग्लंडनं भारताचा दारुण पराभव केला. बॅझबॉल क्रिकेट भारतामध्येही प्रभावी ठरणार असाच, अंदाज सर्वांना होता. पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पलटवार केला. भारताने इंग्लंडला लागोपाठ तीन सामन्यात विजय मिळवला. मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडचा सलग तीन कसोटी सामन्यात पराभव झालाय.


भारताची इंग्लंडवर पाच विकेट्सने मात


शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या अभेद्य भागिदारीनं भारताला चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. या कसोटीत भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतानं पाच कसोटी सामन्यांची 3-1 अशी जिंकली. या कसोटीत इंग्लंडनं भारताला विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं चौथ्या दिवसअखेर बिनबाद 40  धावांची मजल मारली होती. पण आज भारताचा निम्मा संघ 120 धावांत माघारी परतला आणि कसोटी सामन्याचं पारडं पुन्हा दोलायमान झालं. त्या परिस्थितीत शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं 72  धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमननं 124 चेंडूंत नाबाद 52 आणि ध्रुव जुरेलनं 77 चेंडूंत नाबाद 39  धावांची खेळी उभारली. ध्रुव जुरेलला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.