Bhuvneshwar Kumar : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं ( bhuvneshwar kumar) एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेट जगतात त्याची 'स्विंगमास्टर' म्हणून ओळख आहे. भुवनेश्वर कुमारनं आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मोठ इतिहास रचला आहे. भुवनेश्वर कुमार हा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारनं 14 वेळा पहिल्याच षटकात यश मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वरनं हा विक्रम केला आहे. त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला आहे. तर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताना प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 170 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लडचा संघ 17 षटकांत 121 धावाच करु शकला. या सामन्यात भारतानं इंग्लडचा 49 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान, 170 धांवाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर सलामीवीर फलंदाज जेसन रॉय बाद झाला. स्लिपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्मानं त्याचा कॅच घेतला. या सामन्यात त्याने 3 षटकात 15 धावा देत 3 विकेट घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला. भुवनेश्वरने कर्णधार जोस बटलर आणि रिचर्ड ग्लीसन यांनाही बाद केले. पहिल्या T-20 सामन्यात भुवनेश्वरने 3 विकेट घेतल्या होत्या.


भुवनेश्वर कुमारला 14 वेळा मिळालं यश 


भुवनेश्वर कुमारला 14 वेळा  T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच षटकात यश मिळाले आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांबद्दल बोलायचे झाले तर, ही कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. ओमानचा डावखुरा वेगवान गोलंदाज बिलान खाननेही हा पराक्रम 14 वेळा केला आहे. याशिवाय इंग्लंडच्या डेव्हिड विलीने 13, श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने 11 आणि न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पहिल्या षटकात 9 विकेट घेतल्या आहेत. 32 वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने 68 सामन्यात 23 च्या सरासरीने 70 विकेट घेतल्या आहेत. 24 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.