नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पुरुष आणि महिला क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या निवड समितीमधील रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय निवड समितीत दोन पदं भरली जाणार आहेत. तर, महिला निवड समितीत चार पदं भरली जाणार आहेत. बीसीसीआयनं यासाठी अर्ज मागवले आहेत. निवड समिती सदस्य होण्यासाठीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत. अर्जदारांनी किमान 7 कसोटी आणि 30 प्रथमश्रेणी सामने खेळणं आवश्यक आहे. याशिवाय 10 आंतरराष्ट्रीय वनडे सामने आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यानं पीटीआयसोबत बोलताना म्हटलं की निवड समितीच्या सदस्यांच्या कराराचं दरवर्षी नुतनीकरण केलं जातं. आता कोणत्या सदस्यांना बदललं जाणार हे निश्चित केलेलं नाही. मात्र, ही प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे.

सध्या पुरुष संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर आहे. त्याच्या सोबत निवड समितीत एसएस दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस शरथ यांचा समावेश आहे. या निवड समितीनं नुकतीच आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बोर्डानं याशिवाय पुरुष ज्युनिअर क्रिकेट निवड समितीत एख पद भरण्यासाठी अर्ज मागवला आहे. जे शिबीरं, दौरे आणि स्पर्धांसाठी अंडर -22 पर्यंतच्या टीमची निवड करण्यासाठी जबाबदार असतील. एस. शरथ यांच्या जागी प्रज्ञान ओझाची नियुक्ती होऊ शकते, अशा चर्चा सुरु होत्या. 

बीसीसीआयनं महिला राष्ट्रीय निवड समितीच्या चार पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. सध्याच्या निवड समितीत नीतू डेविड अध्यक्ष आहेत. त्यांच्याशिवाय रेणू मार्गेट, आरती वैद्य कल्पना वेंकटचार आणि श्यमा डे शॉ यांचा समावेश आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार श्यामा डे शॉ यांना सोडून इतरांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाईल. सध्याच्या निवड समितीनं 19 ऑगस्टला भारतात होणाऱ्या वनडे संघासाठी टीम इंडियाची निवड केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख 10 सप्टेंबर आहे.

राष्ट्रीय निवड समिती सदस्य (पुरुष ) : 2 जागा

संबंधित खेळाडूनं किमान 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी मॅच किंवा 10 एकदिवसीय सामने आणि 20 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या असाव्यात. खेळाडूनं पाच वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असावी. बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट समितीत 5 वर्षांपर्यंत सदस्य राहिलेलं नसावं.

राष्ट्रीय निवड समिती सदस्य (महिला) :4 जागा

माजी खेळाडू, संबंधित क्रिकेटरनं भारतीय महिला राष्ट्रीय टीमचं प्रतिनिधीत्व केलं असावं. पाच वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी. बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट समितीमध्ये 5 वर्षांपर्यंत सदस्य असू नये.

राष्ट्रीय निवड समिती सदस्य (ज्युनिअर पुरुष ) : 1 जागा

माजी खेळाडूनं 25 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या असाव्यात. किमान पाच वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेी असावी. बीसीसीआयच्या कोणत्याही समितीत 5 वर्षांपर्यंत सदस्य असू नये.