नवी दिल्ली पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार्‍या आशिया चषकबाबत (Asia Cup) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla ) पाकिस्तानला भेट देणार आहेत. रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला 4 सप्टेंबरला लाहोरमध्ये होणाऱ्या आशिया चषक सामन्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. ही भेट म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan Cricket) यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा सुरळीत करण्याकडे एक टाकलेले एक पाऊल आहे का, अशी चर्चा सुरू आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आमंत्रण पाठवले आहे. 


यावेळी आशिया चषकच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. मात्र भारताने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला. बऱ्याच वादानंतर या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसह श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


आशिया चषकचे 5 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. मात्र, या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. 


BCCI अध्यक्षांचा पाकिस्तान दौरा महत्त्वाचा का?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटू संबंधांचा परिणाम क्रिकेटवरही दिसून आला आहे. 2006 पासून भारताने पाकिस्तान दौऱ्यावर एकही संघ पाठवला नाही. पाकिस्तानचा संघही 2012 पासून भारतात आलेला नाही. 2012 पासून, दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा पाकिस्तान दौरा ही महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले जात आहे. 


बीसीसीआयच्या या निर्णयाकडे भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध पुन्हा सुरळीत करण्याकडे उचललेले एक पाऊल म्हटले जाऊ शकते. 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या पुढाकारानंतर टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकते, असे म्हणता येईल. 


पाकिस्तानची अट?


भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये यावे लागेल, अशी मागणीही पाकिस्तानने केल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आली नाही. मात्र, सर्व काही सुरळीत राहिल्यास आगामी काळात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकाही पाहायला मिळू शकते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: