Asia Cup 2025 BCCI May Boycott News : आशिया कप 2025 ही स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये नियोजित होणार आहे. मात्र भारताच्या सहभागावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 24 जुलै रोजी ढाका, बांगलादेशमध्ये एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पण, बीसीसीआयने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, जर ही बैठक ढाकामध्येच झाली, तर ते या बैठकीतील कोणत्याही निर्णयाचा स्वीकार करणार नाहीत आणि स्पर्धेवर बहिष्कार टाकतील.
बीसीसीआयचा मोठा निर्णय
ANI च्या पत्रकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने एसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक़वी यांना कळवले आहे की, ढाकामध्ये जर आशिया कपसंदर्भातील बैठक झाली, तर बीसीसीआय त्यामधून काढता पाय घेईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचे राजकीय संबंध तणावपूर्ण असल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
एक सूत्र म्हणाले, “आशिया कप तेव्हाच खेळवला जाईल, जेव्हा एसीसीची बैठक ढाक्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेतली जाईल. मोहसिन नक़वी भारतावर अनावश्यक दबाव आणत आहेत. स्थान बदलण्यासाठी त्यांना वेळेवर कळवले होते, पण अजून काही उत्तरच मिळालेले नाही. त्यामुळे जर बैठक ढाकामध्येच झाली, तर भारत कोणत्याही निर्णयाचा स्वीकार करणार नाही.”
इतर देशांचाही भारताला पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान यांनीही ढाकामध्ये होणाऱ्या बैठकीला नकार दिला आहे. तरीदेखील मोहसिन नक़वी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसीसीच्या नियमानुसार, भारतासारखा प्रमुख देश जर बैठकीत उपस्थित नसेल, तर घेतलेला कोणताही निर्णय वैध मानला जाणार नाही. त्यामुळे आता बैठकीला फक्त काही दिवस शिल्लक असताना, एसीसीवर निर्णय घेण्यासाठी मोठा दबाव आहे.
भारताच्या भूमिकेमुळे आशिया कप रद्द होणार का?
आशिया कप सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे. मात्र जर सध्याच्या घडामोडी अशाच सुरू राहिल्या, तर ही स्पर्धा स्थगित होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीसीसीआय हा एसीसीचा सर्वात महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्यांच्याविना ही स्पर्धा अपूर्ण ठरू शकते. एकंदरीत, आगामी काही दिवस आशिया कपच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहेत.
हे ही वाचा -