मुंबई : भारतात सध्या कोरोनाच्या दुसरी लाटेने परिस्थिती गंभीर आहे. काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र अद्यापही परिस्थिती नियंत्रणात नाही. देश संकटात असताना अनेकांना पुढे येत मदत केली आहे. यातच आता बीसीसीआयने देखील मदतीचा हात पुढे केला आहे.  बीसीसीआयने 10 लीटरचे 2000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची घोषणा केली आहे. 


पुढील महिन्यांत हे कॉन्सन्ट्रेटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी बीसीसीआयकडून पुरवले जाणार आहेत. यामुळे गरजू रूग्णांना वैद्यकीय मिळेल आणि या उपक्रमामुळे साथीच्या रोगाचा नाश कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की, कोरोनाविरूद्धच्या लढाईत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा देणार्‍या लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अद्यापही ते या संकटाचा सामना करत आहेत. बीसीसीआयने  नेहमीच आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आहे. बीसीसीआयने केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या मदतीमुळे लोकांना दिलासा मिळेल.


व्हायरसविरूद्धच्या लढाईत आम्ही सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. या संकटांच्या काळात वैद्यकीय उपकरणांची नितांत आवश्यक  आहे. बीसीसीआय ही गरज समजून घेतो आणि आशा करतो की या प्रयत्नामुळे देशभरात निर्माण झालेली मागणी आणि पुरवठा यातील तफावत कमी होण्यास मदत होईल. सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. मी सर्व पात्र लोकांना लस घेण्याचे आवाहन करतो, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटलं.