PAK vs BAN, ODI World Cup 2023: शाकीब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेश संघाला आज पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला. बांगलादेशचा हा सात सामन्यातील सहावा पराभव होय. या पराभवासह बांगलादेशचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर घसरलाय. त्याशिवाय त्यांचे विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आलेय. बांगलादेशला विश्वचषकात सलग सहाव्या पराभवाचा सामना करावा लागलाय. बागंलादेशला आतापर्यंत फक्त अफगाणिस्तानविरोधात विजय मिळवता आलाय.
बांगलादेशची स्पर्धेतील कामगिरी -
बागंलादेश संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली होती. 7 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. हे आव्हान बांगलादेशने सहा विकेट राखून पार केले होते.
10 ऑक्टोबर -
गतविजेत्या इंग्लंडने बांगलादेशचा तब्बल 137 धावांनी पराभव केला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 364 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल बांगलादेशचा संघ 227 धावांपर्यंत मजल मारु शकला.
13 ऑक्टोबर -
न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने 245 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले होते.
19 ऑक्टोबर -
भारताकडून सात विकेटने पराभव स्विकारला. पुण्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 256 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल टीम इंडियाने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले होते. भारताकडून विराट कोहलीने शतक ठोकले होते.
24 ऑक्टोबर -
भन्नाट फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 149 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 382 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी बांगलादेशला 233 धावांत रोखले होते.
28 ऑक्टोबर -
नेदरलँड्स संघाने कोलकात्याच्या मैदानावर बांगलादेशला पराभवाचा शॉक दिला. नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा उडवला. नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना 229 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल बांगलादेशचा संघ फक्त 142 धावांत ऑलआऊट झाला.
31 ऑक्टोबर -
आज कोलकात्याच्या मैदानावर बांगलादेशला सलग सहावा पराभव स्विकारावा लागला. पाकिस्तानने बांगलादेशला सात विकेट्सने पराभव केले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 204 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान संघाने हे माफक आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
पुढील सामने कोणते ?
बांगलादेशचे विश्वचषकातील पॅकअप झालेय. आता सात सामन्यात त्यांना फक्त एक विजय मिळवता आलाय. आता त्यांचे पुढील सामने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत आहेत. श्रीलंका संघाचेही विश्वचषकातील आव्हान संपत आलेय. पण बांगलादेश ऑस्ट्रेलियाची पार्टी खराब करु शकतात. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरोधात 11 नोव्हेंबर रोजी पुण्यात भिडणार आहेत.