नवी दिल्ली : भारतानं (India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) अंतिम फेरीच्या लढतीत 7 धावांनी पराभूत करत टी 20 विश्वचषक जिंकला. गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या हातून मॅच खेचून आणली होती. भारताच्या टी 20 विश्वचषक विजयात अक्षर पटेलनं (Axar Patel) महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षर पटेलनं भारताच्या विश्वविजयात फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर महत्त्वाची भूमिका पार पाडली. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील मॅचमध्ये अक्षर पटेलनं दमदार फलंदाजी केली. अक्षर पटेलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी कशी मिळाली याचं गुपित अक्षर पटेलनं उलगडलं आहे.
अक्षर पॅड घाल, रोहितचा मेसेज
रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताच्या डावाची आक्रमकपणे सुरुवात केली होती. मात्र, रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्या पाठोपाठ रिषभ पंत देखील बाद झाला. टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता. भारताची अवस्था 4.3 ओव्हरमध्ये 34 धावा अशी झाली होती. पाचव्या स्थानावर फलंदाजीला येऊन अक्षरनं 47 धावांची महत्त्वाची खेळी केली होती. या खेळीबद्दल अक्षरनं भाष्य केलं आहे.
क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत अक्षर पटेलनं सांगितलं की जेव्हा रिषभ पंत बाद झाला होता तेव्हा रोहित भाईनं अक्षर पॅड घालून तयार रहायला सांगितलं होतं. त्याचवेळी युजवेंद्र चहल देखील धावत आला. राहुल द्रविडनं देखील पॅड घालायला सांगितलं असल्याचं चहलनं सांगितलं. जेव्हा पॅड घालत होतो तेव्हा मला काय करायचं आहे हे माहिती नव्हतं. आमच्या दोन विकेट गेल्या होत्या. खेळपट्टीचं निरीक्षण देखील केलं नव्हतं, असं अक्षर पटेल म्हणाला.
काही वेळानंतर सूर्यकुमार यादव देखील बाद झाला. सर्व काही अचानक घडत होतं. मला विचार करण्यासाठी देखील वेळ नव्हता. मी पायऱ्या उतरत होतो, तेव्हा हार्दिक पांड्यानं मला कोणताही दबाव घ्यायची गरज नाही. फक्त बॉल पाहून हिट कर असा सल्ला दिल्याचं अक्षरनं सांगितलं.
रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव लवकर बाद झाले होते. पाचवी ओव्हर देखील संपली नव्हती. तीन विकेट गेल्या होत्या. अशा वेळी अक्षर पटेलनं विराट कोहलीच्या साथीनं महत्त्वाची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. विराट कोहली आणि अक्षर पटेलनं 72 धावांची भागिदारी केली.
संबंधित बातम्या :