मुंबई : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दाम्पत्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा होती. आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून अधिकृतपणे तशी घोषणा केली आहे. दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतात मोठं नाव कमवणाऱ्या पण वैयक्तिक आयुष्यात मात्र घटस्फोटासारख्या कठीण काळातून जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची चर्चा होत आहे.
याआधी अनेक क्रिकेटपटूंनी घेतलाय घटस्फोट
हार्दिक पांड्याआधी भारतीय क्रिकेट विश्वात मोठं नाव कमवणाऱ्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा घटस्फोट झालेला आहे. यामध्ये दिनेश कार्तिक, मोहम्मद शामी, शिखर धवन यासारख्या बड्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या क्रिकेटपटूंनी भारतासाठी क्रिकेट खेळलेलं आहे. पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते आपला संसार वाचवू शकले नाहीत. वर नमूद केलेल्या सर्व क्रिकेटपटूंनी आपल्या जोडीदारासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शिखर धवन
यामध्ये प्रथम क्रमांकावर नाव येतं ते शिखर धवनचं. कधीकळी हा खेळाडू फलंदाजीसाठी रोहित शर्मासोबत सलामीला यायचा. मैदानावर उतरल्यावर तो चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडतो. वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला कठीण काळातून जावं लागलं. शिखरने 2009 साली मेलबर्नमध्ये आयशा मुखर्जीसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर 2012 साली या जोडीने लगन केलं. त्यांना एक मुलगा आहे. पण लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पत्नीकडून मानसिक त्रास दिला जातोय, असे सांगत शिखरने 2023 साली आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला.
दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकने 21 वर्षाचा असताना 2007 साली त्याची लहानपणीची मैत्रीण निकिता बंजारा हिच्यासोबत लग्न केलं होतं. निकिता आणि दिनेश या दोघांच्या कुटुंबीयांचेही चांगले संबंध होते. पण या दोघांचे लग्न फक्त पाच वर्षेच टिकू शकले. 2012 साली निकिता बंजाराच्या आयुष्यात माजी क्रिकेटपटू मुरली विजय आला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकने निकितापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे 2015 साली दिनेश कार्तिकने स्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केलं.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने 2014 साली हसीन जहाँसोबत लग्न केले होते. आयपीएलच्या सामन्यादरम्यान या दोघांचे लग्न झाले होते. तेव्हा हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी चिअर लीडर म्हणून काम करायची. लग्नानंतर साधारण चार वर्षांनी म्हणजेच 2018 साली हसीन जहाँने मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसेचे आरोप केले. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले. सध्या दोघांमधील हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या दोघांना एक मुलगी आहे.
हार्दिक पांड्या
भारताचा प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनीही नुकतंच विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही तशी घोषणा केली आहे. 2018 साली ते एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट केलं आणि 1 जानेवरी 2020 रोजी त्यांनी लग्न केले. त्यांनी 2023 साली पुन्हा एकदा मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र अलिकडेच या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. आयपीएल, टी-20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भाग असूनदेखील नताशा एकाही सामन्याला दिसली नव्हती. त्यानंतर आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
नताशाला हार्दिक पांड्याकडून पोटगी मिळणार का? पोटगीचं नेमकं गणित काय? वाचा!