Australia vs England 1st Ashes Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस 2025-26 मालिकेचा थरार सुरु झाला आहे. पर्थमध्ये झालेला पहिला कसोटी सामना अवघ्या दीड दिवसांत संपला. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा आर्थिक फटका बसला. चौथ्या डावात ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी शतकामुळे दुसऱ्याच दिवशी निकाल लागला. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर शुक्रवारी आणि शनिवारी प्रेक्षकांनी अक्षरशः तुफान गर्दी केली.

Continues below advertisement


ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला, पण हा विजय त्यांच्यासाठी महागडा ठरला आहे. सामन्याचा निकाल केवळ दोन दिवसात लागल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जवळपास 17.35 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. कारण या कसोटीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवसासाठीची सर्व तिकिटे आधीच विकली गेली होती. आता सामना वेळेपूर्वी संपल्याने त्या दिवसांसाठीचे तिकिटांचे पैसे परत करावे लागणार आहेत.


प्रेक्षकांची विक्रमी गर्दी


पहिल्या दिवशी 49 हजार प्रेक्षक, तर दुसऱ्या दिवशी 51 हजार प्रेक्षक सामन्याचा थरार पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी 60 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला गेला होता. इतकंच नाही, तर रविवारीच्या दिवसासाठीची सर्व तिकिटं आधीच ‘सोल्ड आउट’ झाली होती.  या प्रचंड उपस्थितीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भरघोस कमाई होणार होती. मात्र मिचेल स्टार्कची आग ओकणारी गोलंदाजी आणि ट्रॅव्हिस हेडची धडाकेबाज खेळी यामुळे सामना लवकर संपला. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तिकिट महसूल, खाद्यपदार्थ, पार्किंग आणि इतर स्टेडियम सेवांमधून मिळणारा मोठा उत्पन्नाचा स्रोत गमवावा लागणार आहे.




हेडनं मागितली प्रेक्षकांची माफी


205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडने चौथ्या डावात अवघ्या 69 चेंडूत शतक ठोकत 123 धावांची तुफानी खेळी केली. सामन्यानंतर त्याने रविवारी येऊ न शकलेल्या चाहत्यांची माफीही मागितली. हा सामना संपल्यानंतर हेड तो म्हणाला की “जे 60,000 प्रेक्षक रविवारी सामना पाहण्यासाठी येणार होते, ज्यांचा हा सामना लवकर संपल्यामुळे हिरमोड झाला त्यांची मी माफी मागतो." अंदाजानुसार, पर्थ कसोटी लवकर संपल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तब्बल 17.35 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकतं. अ‍ॅशेससारख्या लोकप्रिय मालिकेत असे आकस्मिक नुकसान क्वचितच पाहायला मिळते, त्यामुळे हा प्रसंग विशेष चर्चेत आला आहे.


पहिल्याच दिवशी 19 विकेट्स! 


या सामन्यात पहिल्याच दिवशी 19 विकेट्स पडल्या होत्या. मिचेल स्टार्कने एकहाती कहर करत 7 विकेट्स घेतल्या. एकूण सामना 13 तासांच्या आत आटोपला आणि 32 विकेट्स गळाल्या. त्यामुळे हा सामना अ‍ॅशेस इतिहासातील वेगाने संपणाऱ्या सामन्यांपैकी एक ठरला आहे.


हे ही वाचा -


Ind Vs Sa 2nd Test : घर पे खेल रहे हो क्या...; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video