PAK vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. बाबर आझमकडे पाकिस्तान संघाची तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानच्या एका खेळाडूची पँट फाटलेली होती. यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या खेळाडू शान मसूद याची पँट फाटलेली दिसली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर खेळाडूचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांनी थट्टा उडवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही काही नेटकऱ्यांनी नाशाणा साधला.
पाकिस्तानच्या चार बाद 476 धावा –
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात 476 धावा चोपल्या. अजहर अलीने 185 आणि इमाम उल हकने 157 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 208 धावांची भागिदारी केली.
ऑस्ट्रेलियाचे प्रत्युत्तर –
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तान संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागिदारी केली. ख्वाजाने 97 आणि वॉर्नरने 68 धावांचे योगदान दिले. मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ आणि कॅमरन ग्रीन यांनीही दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. लाबुशेनने 90, स्टीव स्मिथ 78 आणि ग्रीनने 48 धावांचे योगदान दिले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक (Australia Tour of Pakistan )
4 मार्च ते 8 मार्च - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी
12 मार्च ते16 मार्च - दूसरा कसोटी सामना, कराची
21मारच ते 25 मार्च - तीसरा कसोटी सामना, लाहोर
29 मार्च - पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी
31 मार्च - दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
2 एप्रिल - तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
5 एप्रिल - टी20 सामना, रावळपिंडी