India vs Australia T20 Series: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा (Australia Tour of India) करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतानं अद्याप संघ घोषित केलेला नाही. आशिया चषकात भारतीय गोलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं भारताला आशिया चषकातून बाहेर पडावं लागलंय, असं म्हणण वावगं ठरणार नाही. यामुळं  टीम इंडिया खूप विचार करून खेळाडूंची निवड करेल. 

आशिया चषकात भारताची निराशाजनक कामगिरी
आशिया कप 2022 मध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती. सुपर फोरच्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यांमध्ये भारताचे गोलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आगामी टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ वेगवान गोलंदाजांवर विशेष लक्ष देणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी दीपक चहर, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

जसप्रीत बुमराहचं पुनरागमन होण्याची शक्यता
जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे. परंतु, दुखापतीमुळं त्याला आशिया चषकातून बाहेर पडावं लागलं. दरम्यान, डेथ ओव्हर्समध्ये त्याची कमतरता जाणवली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी तो दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला संघात स्थान मिळू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे.

दीपक चहर आणि अर्शदीप सिंहकडून अपेक्षा
दीपक चहर आणि अर्शदीप सिंहकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहे. आशिया चषकात अर्शदीप सिंहनं चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आशिया चषकात दीपक चहरला चमक दाखवता आली नाही. परंतु, भारताच्या अनेक विजयात त्याचं मोलाचं योगदान आहे. तो दिर्घकाळापासून संघाबाहेर आहे, ज्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यालाही संधी मिळू शकते.

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख  ठिकाण
पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर 2022 मोहाली 
दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर 2022 नागपूर
तिसरा टी-20 सामना 25 सप्टेंबर 2022 हैदराबाद

 

हे देखील वाचा-