AUS vs ZIM: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) दुखापतीमुळं संघातून बाहेर पडलाय. झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मिचेल मार्शला दुखापत झालीय. ज्यामुळं तो झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. एवढंच नव्हे तर, न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतूनंही त्याला वगळण्यात आलंय. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. ज्यामुळं मार्श पर्थ येथे परतेल. येत्या 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी मार्श दुखापतीतून सावरेल, अशी अपेक्षा केली जात आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत मार्शबाबत ऑस्ट्रेलियाचा संघ कोणतीही जोखिम घेणार नाही. 

जोश इंगलिसला ऑस्ट्रेलियाच्या संघात एन्ट्री
मार्शऐवजी यष्टीरक्षक आणि फलंदाज जोश इंगलिस ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आलीय. इंगलिस हा द हंर्डेड टुर्नामेन्टमध्ये लंडन स्पिरिट संघाकडून खेळत होता. तो लवकरच ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील होईल.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) काही दिवसांपूर्वी आगामी पेटीएम सीरिज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहाली येथे खेळला जाईल. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे. 

भारत- ऑस्ट्रलिया यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख  ठिकाण
पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर 2022 मोहाली 
दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर 2022 नागपूर
तिसरा टी-20 सामना 25 सप्टेंबर 2022 हैदराबाद

हे देखील वाचा-